लातूर.रेणापूर तालुका भाजपाचा बालेकिल्ला असून या तालुक्यात कार्यकर्त्यांची मजबुत फळी आहे. आजपर्यंत भाजपाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात अनेक कामे झाली असताना आजपर्यंत कोणत्याही कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्याच्या सुख-दुःखात सहभागी न होता विधानसभा डोळयासमोर ठेवून वेळोवेळी कॉग्रेसकडून सुपारी घेवून भाजपाला विस्कळीत करण्याचे आणि कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना भाजपातून तात्काळ निलंबीत करावे अशी मागणी रेणापूर तालुक्यातील भाजपाच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
रेणापूर तालुका हा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचाराचा आणि भाजपाचा बालेकिल्ला असून कार्यकर्त्याची मजबूत फळी आहे. मागील अनेक वर्षापासून पक्षाचे प्रभावी कार्यक्रम वेळोवेळी यशस्वीपणे राबविले असून भाजपाच्या माध्यमातून या तालुक्यातील गावागावात वाडी वस्ती मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झालेली आहेत.
भारतीय जनता पार्टी एक शिस्तप्रिय आणि रचनात्मक काम करणारी पक्ष संघटना आहे. पक्षात लहान गावचा शाखा अध्यक्षही लोकप्रतिनिधी पेक्षा मोठा असतो. गावागावात अथवा तालुक्यात पक्षाच्या नेत्यांचे, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे दौरा निश्चित होण्यापूर्वी संबंधित स्थानिक पदाधिकाऱ्यांना पूर्व सूचना दिली जाते. प्रदेश अथवा जिल्हा भाजपाच्या वतीने कुठलाही पक्षाचा कार्यक्रम दिला नसताना रेणापूर तालुक्यात भाजपा किसान मोर्चाचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी रेणापूर तालुक्यातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता ते स्वतःहा आणि त्यांचे पुत्र युवा मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी अजितसिंह पाटील कव्हेकर हे रेणापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टी परिवर्तन संकल्प यात्रा या नावाने दौरा करत आहेत. दौऱ्याचा हा कार्यक्रम पक्षाचा नसून वैयक्तिक आहे.
शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी वेळोवेळी काँग्रेसकडून सुपारी घेऊन मजबूत भाजपाला विस्कळीत करण्याचे काम केले आहे. मी म्हणजेच भाजपा आणि भाजपा म्हणजेच मी अशा तोऱ्यात राहणाऱ्या कव्हेकर यांनी आज पर्यंत तालुक्यातील कोणत्याही कार्यकर्त्याच्या सुखदुखात सहभागी झाले नाहीत. कधीच कुठल्याही विकास कामासाठी कसलेही प्रयत्न केले नाहीत आणि आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने पुन्हा एकदा एक संघ मजबूत असलेल्या भाजपाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न आणि कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
रेणापूर तालुका भाजपाचा बालेकिल्ला कायम ठेवण्यासाठी शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना भारतीय जनता पक्षातून तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी रेणापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पक्ष पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर भाजपा तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे, पंचायत राज सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले, जिल्हा सरचिटणीस महेंद्र गोडभरले, ग्रामीण विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे, निमंत्रीत सदस्य प्रदेश भाजपा सतिष अंबेकर, संगायो अध्यक्ष वसंत करमुडे, माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, माजी उपसभापती पं.स अनंत चव्हाण, सरपंच संघटना अध्यक्ष विजय गंभिरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमर चव्हाण, महिला तालुकाध्यक्ष अनुसया फड, ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष विठ्ठल कसपटे, किसान आघाडी तालुकाध्यक्ष जयप्रकाश जटाळ, रेणापूर शहराध्यक्ष अच्युत कातळे, संतोष राठोड, गणेश तुरुप, सुरेंद्र गोडभरले, श्रीकृष्ण जाधव, श्रीकृष्ण पवार, दत्ता सरवदे, भाऊसाहेब गुळभिले, शिला आचार्य यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.