लातूर दि.१४ – रेणापूर येथील तालुका क्रीडा संकुलाच्या विविध विकास कामासाठी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून राज्यातील महायुती शासनाच्या क्रीडा विभागाने २ कोटी ४५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला आहे. सदरील निधी मंजूर झाल्याने खेळाडू सह क्रीडा प्रेमी नागरिकातून आनंद व्यक्त केला जात आहे.
रेणापूर तालुका गेल्या १९९२ साली अस्तित्वात आला तहसील, प्रशासकीय इमारत यासह विविध तालुकास्तरीय कार्यालये विकसित झाले मात्र तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न तसाच कायम राहिला होता. राज्य आणि देश पातळीवर तालुक्यातील अनेक खेळाडूंनी आपल्या खेळाचे नैपुण्य दाखवून यश मिळविले असून रेणापूर शहरासह तालुक्यात खेळाच्या विविध प्रकारातील खेळाडू मोठ्या प्रमाणात असतानाही क्रीडा संकुलाच्या अभावामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
रेणापूर येथील तालुका क्रीडा संकुल विकसित व्हावे, खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी भाजपाचे नेते तथा रेणापूर क्रीडा संकुलाचे अध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे युवक व क्रीडा मंत्री मा. संजयजी बनसोडे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. केलेल्या पाठपुराव्यामुळे तब्बल २ कोटी ४५ लक्ष ३७ हजार रुपयाचा निधी राज्याच्या क्रीडा विभागाने नुकताच मंजूर केला आहे.
मागील काळात या क्रीडा संकुलाच्या मैदान विकासासाठी शासनाकडून ९३ लक्ष रुपयाची मंजुरी मिळाली होती त्यातून धावनपथ, विविध खेळाचे मैदाने सुविधा करण्यात आल्या तर संरक्षण भिंत आणि चेंजिंग रूम प्रसाधनग्रह काम प्रगती पथावर आहे. नव्याने मंजूर झालेल्या २ कोटी ४५ लक्ष रुपये निधीतून बॅडमिंटन हॉल, २०० मीटर धावनपथ, हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो मैदान विकसित करण्याबरोबरच ऑफिस, स्टोर रूम आदी कामे केली जाणार आहेत. रेणापूर तालुका क्रीडा संकुलनासाठी आतापर्यंत एकूण ३ कोटी ३८ लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती देऊन आ. रमेशआप्पा कराड यांनी सदरील निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यांचे आभार व्यक्त केले आहेत.